अहमदनगर (दि ६ नोव्हेंबर २०२०) : केंद्रामध्ये आरएसएस प्रणित भाजपचे मोदी सरकार आल्यापासून देशामध्ये मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. मोदी सरकारला संविधानच मान्य नसून समानतेचा विचार मांडणार संविधानच बदलून टाकण्याचे षड्यंत्र देशात सुरू आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे आ. लहू कानडे यांनी केले आहे.मागासवर्गीय,अल्पसंख्याक समाजावरील अत्याचाराच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून याबाबत अहमदनगर शहरामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. कानडे बोलत होते. मार्केट यार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करत काँग्रेसच्या वतीने शांततामय पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्यासह जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, अहमदनगर शहर मागासवर्गीय सेलचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, अल्पसंख्यांक विभागाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अज्जू शेख,नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, ज्येष्ठ नेते विजु परदेशी, विशाल कळमकर, प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबुज, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. माणिकराव मोरे, अशोक कानडे, जिल्हा सचिव मनसुख संचेती आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाज हा कायम काँग्रेस पक्षाच्या विचारासोबत राहिलेला आहे. आज या समाजावरती सुरू असलेला अन्याय हा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण करणारा आहे. देशभरात सुरू असणार्‍या अन्यायाच्या घटनांचा आम्ही निषेध करतोच, परंतु अहमदनगर शहरामध्ये देखील मागासवर्गीय, अल्पसंख्यांक बांधवांवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल, तेव्हा काँग्रेस ही संपूर्ण ताकदीनिशी समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल.

यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष वाघमारे, जिल्हा सचिव शिवाजीराव जगताप, अन्वर सय्यद, मूबीन शेख, अनिस चुडीवाल, बंटी यादव आदींची भाषणे झाली. गणेश आप्रे, चेतन रोहोकले,अक्षय कुलट, संदीप पुंड, चंद्रकांत उजागरे, मनोज चव्हाण आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.