
अहमदनगर (दि ६ नोव्हेंबर २०२०) : शहर व उपनगरात सुरू असलेल्या पॅचिंगच्या कामाची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखे, पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव आदी उपस्थित होते.यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, शहरामध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. परंतु पावसामध्ये डांबराने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेता येत नव्हते. परंतु मध्यंतरी पाऊस थांबल्यानंतर पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला, त्यामुळे पॅचिंगचे काम थांबविण्यात आले होते. आता पाऊस उघडल्यानंतर पॅचिंगच्या कामास सुरूवात करण्यात आली असून शहरामध्ये पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले. पॅचिंगच्या कामाची पाहणी करून संबंधीत शहर अभियंत्यांना पॅचिंगचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल. पॅचिंगचे काम झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळणार आहे.अहमदनगर शहरातून महामार्ग व राज्य महामार्गाचे रस्ते जात असून यावरही मोठ-मोठे खड्डे पडलेले होते, ते बुजविण्याबाबत देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व जागतिक बॅँक प्रकल्प यांना कळविण्यात आले होते. बांधकाम विभागाकडून देखील पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले आहे असेही ते म्हणाले.
