अहमदनगर (लोणी) २९ ऑक्टोबर २०२० : पावसाळा आता थांबला असल्याने विलंब न करता नगर मनमाड रस्त्याच्या साइड गटारीच्या कामाला प्रांरभ करा, या मार्गाची हद्द निश्‍चित असल्याने सुप्रिम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे या मार्गावरील अतिक्रमण काढून टाकण्याबाबत गांभीर्याने कार्यवाही करून वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत करून देण्याच्या सूचना आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर मनमाड रस्त्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून या मार्गाचे काम तातडीने सुरू होण्याबाबत अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली.यापुर्वी या मार्गावरील परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले होते. या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रूपये उपलब्ध करुन देण्याचे ओशासन आ.विखे पाटील यांना देण्यात आले होते.

या मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या साइड गटारीवर झालेली अतिक्रमण आणि रस्त्यावर साठणारे पावसाचे पाणी यामुळे खड्ड्यांचे वाढलेले प्रमाण आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून आ. विखे यांनी या रस्त्याच्या कामासाठी गांभीर्याने पाठपुरावासुरू केला आहे.या पार्श्वभूमीवर आ. विखे यांनी अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली या बैठकीस अधिक्षक अभियंता कुलकर्णी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी पालवे, कनिष्ठ अभियंता बांगर आदी उपस्थित होते.

रस्त्याच्या कामाबाबत प्रशासकीय आणि न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी घेतला. पाऊस थांबल्याने आता कामाला सुरूवात करण्यात कोणतीही अडचण नाही.त्यामुळे निश्‍चित असलेली रस्त्याची हद्द गृहीत धरून साईड गटारीची कामे तातडीने सुरू करण्यास प्राधान्य देण्याबाबत त्यांनी सुचित केले. या मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी इतर शासकीय यंत्रणेची मदत घेतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबतही आ.विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

कोल्हार येथील पुलाच्या कामाबाबतही आ.विखे यांनी अधिकार्‍यांना महत्वपूर्ण सूचना केल्या.केंद्र सरकारच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळविण्याचा पाठपुरावा खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेला पाठपुरावा तसेच हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा तपशील बैठकीत प्रामुख्याने चर्चिला गेला. शिर्डी बाह्यवळण रस्त्याच्या कामाचाही आढावा आ.विखे यांनी या बैठकीत आढावा घेतला. या मार्गाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून डांबरीकरण करणे हाच पर्याय असल्याने उपलब्ध होणार्‍या 15 कोटी रुपये निधीतून सदर काम पूर्ण करण्याची ग्वाही अधिकार्‍यांनी या बैठकीत दिली.