
अहमदनगर (दि २८ ऑक्टोबर २०२०) : शनी चौकातील बक्कर कसाब जमात मस्ज़िद ट्रस्टला महानगरपालिकेने वाणिज्यप्रमाणे आकारलेला कर व त्यावर लावलेली शास्ती रु. 2 लाख 64 हजार रुपयांचा संकलित कर प्रभागाचे शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे व नगरसेविका मंगलताई लोखंडे यांच्या पाठपुराव्यामुळे कमी करण्यात आली. याबाबतचे पत्र मस्ज़िद ट्रस्टच्या पदाधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी परेश लोखंडे, शेख शौकत अली, हाजी इरफान, हाजी अब्बास, हाजी रफिक हुसेन, हाजी रहेमान, हाजी लाला, अब्दुल सलाम, हाजी नौशाद, तारीक कुरेशी, आसिफ पटवा आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, शनी चौकातील बक्कर कसाब मस्ज़िद येथे फक्त धार्मिक कार्यक्रम होतात.
त्यांचा व्यवसायिक वापर नसल्याने मनपाकडून चुकीच्या पद्धतीने संकलित कर आकारण्यात आला होता. वास्तविक पाहता मनपा अधिनियमन 132(1) (ब) प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही. याबाबत आम्ही मनपाकडे कायदेशीररित्या सातत्याने पाठपुरावा करुन चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला कर मागे घेण्यास भाग पाडले.
त्याचप्रमाणे अहमदनगरमधील कोणतेही धार्मिकस्थळ जसे मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च आदिंचा वापर जर वयवसायिक होत नसेल तर त्यांचाही कर कमी करण्यासाठी आमच्याशी किंवा मनपाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
