नाशिक (दि २८ ऑक्टोबर २०२०) : कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणं ही चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यतीचे सर्व अधिकार केंद्राकडे असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नावर महत्तपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.शरद पवारांनी यावेळी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये असं सांगितलं. “राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये. कारण त्यांना अधिकार नाही.

धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही. निर्यातबंदी, आयात या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतात,” असं शरद पवार यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय बाजारात नाशिकचा कांदा असतो असं यावेळी त्यांनी नमूद केलं.“कांद्याची चर्चा झाल्याशिवाय नाशिकला आलं असं वाटत नाही.

शेतकरी कष्टाने उत्पादन घेतात. प्रमाण आणि दर्जा या दोन गोष्टींमध्ये नाशिकचा पहिला क्रमांक. बाजारातील चढ उतार याची झळ कांद्याला सर्वाधिक बसते. कांद्याचा दरात कायम चढ-उतार ही चिंतेची बाब आहे. कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असून निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय आहेत,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.