तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
सोलापूर (दि १९ ऑक्टोबर २०२०) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल झाले असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यांच्या सोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात असून यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि अतिवृष्टी आणि पुराची आपत्ती मोठी आहे. या संकटात राज्य सरकार आपली जबाबदारी अजिबात झटकणार नाही. हे सरकार जनतेचे आणि शेतकऱ्यांचे आहे. कोणालाही वा-यावर सोडणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोर नदी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आज या परिसराला मुख्यमंत्र्यांसमवेत भेट दिली. शेतकरी बांधवांना धीर दिला. आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
सोलापुरात दाखल झाल्यानंतर ठाकरे हे थेट अक्कलकोटकडे रवाना झाले. तेथील बोरी नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द व सांगवी बुद्रूक या दोन्ही गावांना जोडणा-या पुलावर जाऊन त्यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडून नुकसानीच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यांच्या समवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान रामपूर येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची आणि इतर नुकसानीची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.




