तुळजापुर (दि १९ ऑक्टोबर २०२०) : अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त पंढरपूर, इंदापुर,उस्मानाबाद, लातूर मध्ये नुकसान झाल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. आज शरद पवार यांनी तुळजापुरात माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रानं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावं, असा उपाय त्यांनी सुचवला.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहणी करून गेल्यानंतर त्यांना भेटेन. अतिवृष्टीच्या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज लागेल, तर महाराष्ट्रानं ते कर्ज घ्यावं. काही वर्षांपासून कर्जरोखे घ्यायला महाराष्ट्रानं सुरुवात केली आणि त्याला बाजारात चांगला प्रतिसाद आहे, अशी बातमी आहे. कर्ज हे डोक्यावरचं ओझं आहे. पण लोकांना बाहेर काढण्यासाठी दुसरा पर्याय नाही.”असं पवार म्हणाले.

“अतिवृष्टीच्या संकटाला महाराष्ट्र तोंड देतोय. काही जिल्ह्यात नुकसानीचं प्रमाण जास्त आहे. सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालंय,” असं पवार म्हणाले.अतिवृष्टीमुळे ऊसाचं मोठं नुकसान झालं आहे. साखर कारखानदारी लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पवारांनी सांगितलं. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “एकनाथ खडसे यांचं भाजपच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे. ते विविध खात्यांचे मंत्री होते. त्यांना वाटत असेल की त्यांच्या कामाची नोंद घेतली जात नाहीये तर तो त्यांचा निर्णय आहे.”