‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम
आरोग्य सर्वेक्षणावेळी सारी आणि इतर आजार असणाऱ्यांच्या नोंदी घ्या
प्रादुर्भाव रोखण्यासाठी या घटकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

अहमदनगर – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू असून आरोग्य सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी सारी आणि इतर आजार असणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घ्याव्यात. तालुकास्तरीय यंत्रणेने या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केल्या.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय यंत्रणांशी संवाद साधून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी  डॉ. दादासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते. तालुकास्तरावरुन नगरपंचायत आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.

 यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत हा टप्पा सुरू राहणार आहे. सुरुवातीला असणारा कमी वेग आरोग्य यंत्रणा आणि संबंधित तालुका प्रशासन यांच्या प्रयत्नामुळे आपण पहिल्या टप्प्यात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो. जवळपास सर्वच तालुक्याने चांगले काम केले. हे काम पोर्टलवर अपलोड होणे गरजेचे आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यांनी तत्काळ त्याचे निराकरण करून घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सर्वेक्षण करताना पहिल्या टप्प्यात जे नागरिक बाहेरगावी होते किंवा पथक तपासणीसाठी गेले तेव्हा घरी आढळले नाहीत, अशा कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या नोंदी कराव्यात.तसेच ज्या कुटुंब आणि त्यातील सदस्यांची माहिती व तपासणी पहिल्या टप्प्यात झाली आहे, दुसऱ्या टप्प्यात त्याठिकाणी पुन्हा भेट देऊन संबंधित सदस्यांची ऑक्सिजन लेवल आणि शरीराचे तापमान आदींची माहिती नोंदवावी. काही त्रास होतो किंवा कसे याबद्दलही माहिती घेण्यास त्यांनी सांगितले.

मोहीम कालावधीत जे सारी आणि को मोर्बिड आजाराने त्रस्त रुग्ण आहेत, त्यांची कोविड -१९ चाचणी केली जावी.  पोजिटीव रुग्ण आढळल्यास त्याच्या निकट संपर्कातील तसेच कमी निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांचीही चाचणी करण्यात यावी. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

मोहिमेच्या कालावधीत कामाची गतिमानता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आरटीपीसीआर चाचणी आणि अॅन्टीजेन चाचण्यांच्या माध्यमातून तालुकास्तरावर तपासण्या होत आहेत. त्या रुग्णांची नोंद या मोहिमेच्या कामाच्या अनुषंगाने होत आहे का, हे पाहण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला केल्या.  गेले सहा महिने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. कामाचा हाच वेग या मोहिमेत कायम ठेवायची सूचना त्यांनी केली. 

 ***