
तुळजापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर येत्या १० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी अशी मागणी करणार असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनी काकरअंबावाडी तसेच लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही केंद्र सरकारने पुढाकार घेऊन भरीव मदत करावी राज्यसरकारला मर्यादा आहेत. कधी न भरून येणार नुकसान झाले आहे.

या संकटाला खचून न जाता एका धीराने सामना करावा लागेल, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांच शिष्टमंडळ घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या या पाहणी दौऱ्याची सुरुवात बारामतीपासून होणार आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागांतील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले असून, या शेतकर्यांना मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
