
स्नेहबंध फौंडेशन, अहमदनगर पोलीस दल व इनरव्हील क्लब यांच्या वतीने आयोजित भिंगार शहरातील उत्कृष्ट गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पैठणीच्या मानकरी संस्कृती पेंडुरकर या ठरल्या. सविता हिकरे, इंदिरा फल्ले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे व इनरव्हीलच्या अध्यक्षा वंदना भंडारी यांचे संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पैठणी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेत एकूण 18 सहभागी आरासींचे परीक्षण करण्यात आले. यावेळी भंडारी सप्लायर्सचे रुपेश भंडारी, रेश्मा चारानिया, शहाजमीन चारानिया, हेमंत ढाकेफळकर, सचिन पेंडुरकर आदी उपस्थित होते. स्नेहबंध फौंडेशनने या उपक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून चांगले आणि दर्जेदार उपक्रम भविष्यकाळातही आयोजित करण्यात येणार आहेत, असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगितले.
