अहमदनगर : विवाह सोहळ्यास 500 लोकांची उपस्थितीची परवानगी मिळावी अशी मागणी मंगल कार्यालये, मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, बँड साऊंड असोसिएशनच्यावतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली. कोरोना महामारीचे संकट व लॉकडाऊनमुळे गेल्या 7 महिन्यांपासून मंगल कार्यालय, मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, बॅड, साऊंड व लग्न सोहळ्याशी संबंधित सर्व यंत्रणा अत्यंत आर्थिक अडचणीत आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या 7 महिन्यात सर्व नियम व अटींचे पालन करून हे कार्य पार पाडले.

मात्र 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी असल्याने मंगल कार्यालयाची भाडे व विवाह सोहळ्याशी संबंधित इतर सर्व यंत्रणांच्या मानधनावर मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वजण आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यावसाय करणार्‍यांनी विविध राष्ट्रीयकृत बँकेकडून लाखो रुपये कर्ज काढून तसेच आपल्याकडील रकमेची गुंतवणूक करुन व्यवसाय म्हणून मंगल कार्यालयाची उभारणी केलेली आहे. चालकांना दरमहा बॅकेचे हप्ते भरावे लागतात. गेल्या काही महिन्यांत हे हप्ते भरणे शक्य न झाल्याने अनेक बॅकांनी या सर्व नोटीसा बजावल्या आहेत. काही व्यावसायिकांच्या मालमत्ता जप्तीची वेळ आली आहे.

तसेच या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कर्मचाऱ्यांचे पगार, लाईटबील, कार्यालयाची देखभाल व महानगरपालिकेचे विविध कर भरणे यामुळे सर्व व्यावसायिक मेटाकुटीला आलेले आहेत, अनेक जणांवर आत्महत्यांची वेळ येऊन ठेपलेली आहे. या परिस्थितीत या व्यावसायिकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा व शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी मंगल कार्यालय, मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, बँड, साऊंड असोसिएशन अहमदनगर यांच्यावतीने आ. संग्राम जगताप यांच्याकडे करण्यात आले. यावेळी राजेंद्र उदागे, गणेश भुतारे, सुरेश रोकडे, रघुनाथ चौरे, संतोष तोडकर, हेमंत राजपूत आदी उपस्थित होते.

यावेळी केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे : विवाह सोहळ्यासाठी 500 लोकांना परवानगी देण्यात यावी, महानगरपालिकेचे सर्व कर माफ करावे. बँकांचे कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी. कोरोना काळातील व्याजदर माफ करावा. वीजबिल माफ करावे, जीएसटी कर 18 टक्क्यांवरुन 5 टक्के करावा. या व्यावसायिकांना उद्योगाचा दर्जा द्यावा.