अहमदनगर (दि ६ ऑक्टोबर २०२०) : अनेक वर्षापासून तपोवन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरु आहे. मात्र ते निकृष्ट झाल्याने शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी आक्षेप घेऊन चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या पुण्याच्या कार्यालयामार्फत जुलै महिन्यात कामाच्या तपासणीसाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षकांची नियुक्ती केली होती. या पाहणीच्या अहवालाची मागणी करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता एच. एन. सानप यांची भेट घेवून त्यांना धारेवर धरले.

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, ऋषिकेश ढवन, दत्ता हजारे आदी उपस्थित होते. यावेळी सेनेच्या सर्व पदाधिकार्‍यानी अभियंता सानप यांना जाब विचारला. गुणवत्ता तपासणी अहवाल अद्याप का प्राप्त झाला नाही, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तपोवन रस्त्याचे काम निकृष्ठ झाले. हा रस्ता पुन्हा नव्याने करावा, रस्त्याच्या कामाची निविदा पुन्हा नव्याने काढावी. भ्रष्टाचार करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकावे आदी मागण्या करत शिवसेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी भगवान फुलसौंदर म्हणाले, मनमाड व औरंगाबाद रस्त्याला जोडणारा तपोवन रस्ता अहमदनगर शहरातील प्रमुख रस्ता असून जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे. उपनेते अनिल राठोड यांनी या रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र मुख्यमंत्री निधीतील या पैशाचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. साडेतीन कोटी रुपयांतून तीन किलोमीटर होणार्‍या या रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे सध्या या रस्यावर सुमारे तीन हजार खड्डे पडले आहेत.

शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, शिवसेना अहमदनगर शहरातील विकासकामांवर लक्ष ठेऊन आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय होवू नये यासाठी आम्ही कायम आक्रमक असतो. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले. तसेच या कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यकारी अभियंता सानप यांनी अद्याप अहवाल कार्यालयास प्राप्त झाला नसल्याचे सांगून गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी यांच्याशी संपर्क करून अहवालाबद्दल चौकशी केली.