
अहमदनगर – स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांच्याकडून अद्याप खुलास प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात येईल, अशी भूमिका भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी स्पष्ट केली. स्थायी समितीवर भाजपच्या कोट्यातून सदस्य झालेल्या कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून सभापतीपद मिळविले. त्यानंतर दुसर्याच दिवशी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कोतकर भाजपचेच असल्याचा दावा केला. मात्र,कोतकरांनी ते कोणत्या पक्षाचे आहेत, यावर बोलण्याचे टाळले.
दरम्यान, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी कोतकर यांना ते भाजपचे आहेत की राष्ट्रवादीचे, हे स्पष्ट करण्याची सूचना देणारी नोटीस बजावली आहे. सोमवारी ही नोटीस पाठवून तीन दिवसांत खुलासा मागविला होता. आपण भाजपचा राजीनामा दिला काय, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होता काय, याचा खुलासा करण्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. तसेच भाजपकडून आपण नगरसेवक म्हणून निवडून आला असल्याने पक्ष हिताविरुद्ध कोणताही निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आपल्याला नाही, त्यामुळे तीन दिवसात आपण भाजपचा राजीनामा दिला काय व राष्ट्रवादीचे उमेदवार होता काय, याचा खुलासां करण्याचे सांगितले आहे. सोमवारी ही नोटीस त्यांना दिली होती. आता भाजपकडून सभापती कोतकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी भूमिका घेण्यात आली आहे.
