
नाशिक विभागीय आढावा बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अहमदनगर– कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी जिल्ह्यात चांगल्या प्रकारे होत असल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक कुटुंबाने आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे राज्यातील सर्व महसूल विभागनिहाय प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत. श्री. ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथून तर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा चे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे आदी उपस्थित होते.
सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी, पालकमंत्री श्री. मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्याकडून जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, त्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती घेतली. जिल्ह्यातील औषध पुरवठा, ऑक्सिजनची उपलब्धता आधीची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या सर्वेक्षणातून आपल्याला प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्यविषयक माहिती मिळणार आहे. त्याचा लाभ आपल्याला आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यासाठी आखण्यात येणाऱ्या धोरणासाठी होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा आरोग्यविषयक आराखडा (हेल्थ मॅप) आपण याद्वारे तयार करू शकू. कोरोना दुतांच्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचत आहोत. हो मोहीम अधिक गतिमान करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.अनलॉक नंतर नागरिकांमध्ये काही प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिक दक्षता घेतली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वेक्षण गतिमान करणे आणि त्याचसोबत जनजागृती करणे या बाबींवर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्यात आपण आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय तात्काळ घेतले. त्याची अंमलजावणीही सुरू केली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नात आपण कुठेही कसूर सोडत नाही, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचसोबत आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी सारखी मोहीम राबवित आहोत, असे त्यांनी नमूद केले.

आजपर्यंत ही लढाई आपण घरात बसून लढत होतो, या मोहिमेसाठी आता बाहेर पडून लढावी लागणार आहे. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी, गाव, जिल्हा व राज्यासाठी आरोग्यासाठी जे जे काही आवश्यक आणि गरजेचे आहे, ते ते करावे लागणार आहे, प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी यात निश्चितच सहभाग घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हाणाले.यावेळी जिल्हाधिकारी श्री.द्विवेदी यांनी सांगितले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमसाठी जिल्ह्यात सतराशे पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे.जिल्ह्यातील ४० लाख इतक्या लोकसंख्येपर्यंत एका महिन्यात दोन वेळा पोहोचायचे उद्दिष्ट्य ठेवले असून अधिक गतीने हे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवली आहे त्यामुळे नवे रुग्ण वाढत असले तरी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णाचे प्रमाण हे ८७ टक्क्यांहून अधिक आहे.
****
