अहमदनगर (दि २४ सप्टेंबर २०२०) : धनगर समाजाचा एस.टी.मध्ये समावेश झालेला असताना देखील एसटीची अंमलबजावणी होत नसल्याने धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक दिवसापासून धनगर समाज एस. टी.आरक्षण अंमलबजावणीसाठी संघर्ष करत आहे. म्हणून धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शन करण्यात आले. यावेळी दादाभाऊ चितळकर, शांतीलाल कोपनर, भानुदास हाके, युवराज हाके, शहादेव गुंजाळ, सुभाष पाचारणे, विलास जांभळकर, महेश काटमोरे, देविदास कोपनर, शिवाजी नवले, निवृत्ती दातीर, विठ्ठलराव वाघमोडे, श्रीकांत बाचकर आदींसह धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

धनगर समाजाला एसटी आरक्षणा मध्ये समाविष्ट करून महाराष्ट्र सरकारने विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये ठराव करून धनगर व धनगड हे एकच आहेत अशी केंद्र सरकारला शिफॅरस करावी व केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेश काढून आरक्षण देण्यात यावे किंवा राष्ट्रपती यांनी वटहुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे. महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या 65 वर्षापासून एसटी आरक्षणाची मागणी करीत आहे.

तरी याची रिटपेटिशन उच्च न्यायालयात केस नंबर 4919 चालू आहे तरी राज्य सरकारच्या वतीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालू लवकरात लवकर न्याय द्यावा व धनगर समाजाच्या पदोन्नतीस पात्र असलेल्यांना एस सी, एसटी, ओबीसी, एन टी, व्ही जे एन टी, कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात यावीव पोलीस मेगा भरती तत्काळ सुरू करण्यात यावी व धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील सरकारने मंजूर केलेला 1000 कोटी रुपयाचा निधी तात्काळ वितरित करावा व धनगर समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.