
अहमदनगर (दि २३ सप्टेंबर २०२०) जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा संपला असून, खासगी रुग्णालयांमध्येही त्याचा तुटवडा जाणवत असल्याने तातडीने अहमदनगरसाठी या इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून केली.टोपे यांना या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. श्वसनाचा त्रास होणार्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपयोगी ठरते. त्यामुळे या इंजेक्शनचा साठा मुबलक असणे गरजेचे आहे. नगर जिल्हा रुग्णालयातील जिल्हा चिकित्सकांनी या इंजेक्शनचा साठा संपल्याचे जाहीर केले आहे. तसेच खासगी रुग्णालयातही याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत.इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराट पसरली आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत असून, पैसाही जास्त खर्च होत आहे. यासाठी रुग्णांचे नातेवाईक मला माहिती देत इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. नगर जिल्ह्याला या तुलनेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. ही बाब गंभीर असून, यात लक्ष घालून नगर जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी केली आहे.
