अहमदनगर (दि २३ सप्टेंबर २०२०) : माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी महापालिकेने शहरात प्रभागनिहाय कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून, यासाठी महापालिकेचे 254 कर्मचारी घरोघर सर्वेक्षणासाठी जाणार आहेत. मात्र आम्हाला घरात घेतील का, असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. राज्य सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची तपासणी करणे, त्यांना कोणता त्रास जाणवत आहे का, याची माहिती घेणे व त्यासाठी उपचारास त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी मार्गदर्शन करणे ही कामे या मोहिमेतून हाती घेण्यात येणार आहेत. तसा अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार आहे. महापालिकेने यासाठी 254 कर्मचारी नियुक्त केले आहेत. या कर्मचार्‍यांमार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोरोना टाळण्यासाठी गर्दी कमी करा असे आवाहन करतानाच घरी अनोळखींना येऊ देऊ नका, असेही सांगितले जात आहे. येणार्‍यास कोणती लक्षणे आहेत, याची माहिती नसल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना घरात येऊ देतील का, असा प्रश्‍न या कर्मचार्‍यांनाच पडला आहे.सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचार्‍यांची योग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यंतरी दौर्‍यावर आले असता सांगितले होते.