मुंबई, : अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासह अनेकांनी बॉलिवूडमधील दिग्गजांना टार्गेट केलं. या सगळ्या वादाची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे,’ असा खळबळजनक आरोप पायल घोष हिने केला आहे. त्यामुळे एकीकडे बॉलिवूडवर आरोप करणाऱ्या कंगनाविरोधात जाहीर भूमिका घेतल्याने चर्चेत असलेल्या अनुराग कश्यप याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्याच्यावर थेट लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये अभिनेत्री पायल घोष हिने अनुराग कश्यप याच्यावर आरोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे. ‘नरेंद्र मोदीजी आपण याप्रकरणी कारवाई करावी आणि या क्रिएटिव्ह माणसाआडचा राक्षस देशाला पाहू द्या,’ अशी विनंतीही पायलने केली आहे. ‘मला माहीत आहे की यामुळे माझे नुकसान होऊ शकते आणि माझी सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कृपया मदत करा,’ असंही तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.पायल घोष हिने या ट्वीटसोबत तेलगू वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसंच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप या व्हिडिओतून पायल घोषने केला आहे.