अहमदनगर (दिनांक: १२ सप्टेंबर २०२०) : कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या व निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करणार्‍या सॅलेवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला सामाजिक कार्यकर्ते तथा मानवाधिकार अभियानचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संतोष गायकवाड यांच्या पुढाकाराने हॉस्पिटलला सॅनीटायझर व मास्कची भेट देण्यात आली. ह.भ.प. अमित महाराज धाडगे यांच्या हस्ते सदर साहित्य हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. संतोष गायकवाड,फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, प्रशांत पगारे, प्रतिक ठोंबरे, विवेक विधाते, संतोष मोरे आदि उपस्थित होते.ह.भ.प. अमित महाराज धाडगे यांनी बुथ हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक करुन, या संकटकाळात हॉस्पिटलचे कर्मचारी मानवरुपी ईश्‍वरसेवा करीत आहे. कठिण काळात नगरकरांना बुथ हॉस्पिटलने मोठा आधार दिला. सध्या रुग्णांची संख्या वाढत असताना काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर बोरुडे यांनी बुथ हॉस्पिटलच्या कार्यामुळे अहमदनगरच्या नावलौकीकात भर पडलेली आहे. तर या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यास बळ मिळाले आहे.गोरगरिब रुग्ण या हॉस्पिटलकडे नेहमी आशेने पाहत असतात व त्या अपेक्षेला हे हॉस्पिटल खरे उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. संतोष गायकवाड यांनी चांगल्या कार्याला समाजाने देखील बळ देण्याची गरज आहे. या संकटकाळात इतर हॉस्पिटलची वेगळी परिस्थिती असून, या सेवाभावी हॉस्पिटलला मदत करण्यास पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले