
अहमदनगर (दि ५ सप्टेंबर २०२०) । कोरोना लॉकडाऊन कालावधीत येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ. अमोल बागुल यांच्या ई-लोक शिक्षा अभियानामध्ये 25 मार्च ते 25 ऑगस्ट 2020 या 150 दिवसांमध्ये राज्यभरातील सुमारे पंधरा लाखांपेक्षा अधिक शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवला. या उपक्रमाची दखल संयुक्त अरब अमिरातीच्या ब्रावो वर्ल्ड रेकॉर्ड फाउंडेशनने घेतली असून या जागतिक विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र नुकतेच डॉ. बागूल यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांच्या हस्ते स्वीकारले.
फाऊंडेशनच्या एशियन सब कॉन्टिनेन्टल एडिशनमध्ये या उपक्रमाचा गौरव करण्यात आला आहे.एक्सलूझिव्ह इन्स्टिट्यूट, असेट फाउंडेशन आणि होप इंटरनॅशनलने या उपक्रमाला जागतिक विक्रमाची प्रमाणपत्रे प्रदान केली आहेत. ‘यूएई’च्या शारजा येथील अनेक मराठी कुटुंबे डॉ. बागुल यांच्या या उपक्रमात सहभागी आहेत. ई म्हणजे इंटरनेटचा वापर करून सामान्य नागरिकांना विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, संगणकीय स्तरावरील प्रशिक्षणे, सेमिनार, अभ्यासक्रम यांची माहिती ऑनलाइन पाठवण्याच्या उपक्रमाला डॉ. बागुल यांनी ई-लोक शिक्षा अभियान असे नाव दिले आहे.यामध्ये देशातील पहिलाच प्रयोग असलेल्या राष्ट्राचे शिल्पकार, ई माहिती दूत, आयसीटी बॉस, मान्सून आर्ट कॅम्प आणि स्टडी फ्रॉम होम पॅटर्न या विविध संकल्पनांचा समावेश आहे. हा उपक्रम मोफत आहे.5 सप्टेंबर 2019 रोजी डॉ. बागुल यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. त्या समारोहातील अभिभाषणामध्ये राष्ट्रपती महोदयांनी शिक्षकांना एक वर्षांमध्ये भरीव कामगिरी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. बागुल यांनी वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवून शिक्षक-पालक विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शिक्षणाबद्दल जनजागृती केली.डॉ. बागूल यांना या उपक्रमासाठी स्वखर्चातून दररोज सुमारे 20 जीबी डेटा लागतो. तसेच बागुल दररोज साधारणत: 14 तास या उपक्रमावर काम करतात. सुमारे चार हजारपेक्षा जास्त व्हाट्सअप ग्रुप तयार करून मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू या पाच माध्यमातून दररोजचा अभ्यास विद्यार्थ्यांना पाठवला जातो.
कोरोनाची व्याप्ती लक्षात घेऊन डॉ. बागुल यांनी या उपक्रमाचे जम्बो वेळापत्रक तयार केले आहे. यानुसार विविध विषयांचे आदल्या दिवशी नियोजन करून चार मोबाईलच्या माध्यमातून मेसेजेस मोफत पाठवले जातात.डॉ. बागुल यांच्या उपक्रमाला भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, कॅबिनेट मंत्री संजोग धोत्रे, महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामदास हराळ आदींचे मार्गदर्शन आहे.
