पुणे (दि १९ ऑगस्ट २०२०) : डॉ.राजेश देशमुख यांनी बुधवारी पुणे जिल्हाधिकारीपदाची सुत्रे स्विकारली. भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यक्षम अधिकारी अशी ओळख.सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळचे जिल्हाधिकारीपदाची कारकिर्द उत्कृष्ट राहिली. डॉ. देशमुख यांची क्षमता लक्षात घेऊनच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी करोनोचं वाढतं आव्हान पेलण्यासाठी त्यांची निवड केली. आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याचा अनुभव आणि प्रशासन लोकाभिमुख करण्याची हातोटी असल्याने करोनाचे आव्हान, देशमुख यशस्वीपणे पेलतील असे मानले जात आहे.

महाराष्ट्रतील दुसऱ्या क्रमांकाच्या पुणे शहरात मागील पाच महिन्यांत करोना विषाणूचा संसंर्ग मोठ्या प्रमाणात झाला.करोनाचे वाढते संकट पेलण्याची क्षमता असलेल्या अधिकाऱ्याचा शोध डॉ.राजेश देशमुख यांच्या नावाजवळ येऊन थांबला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी देशमुख यांची क्षमता आणि पूर्वानुभव लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून त्यांनी नियुक्ती केली.  आयएएस श्रेणीत निवड झाल्यानंतर डॉ. देशमुख यांनी पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले.सुरुवातीला जिल्ह्याचा ६२ हजार शौचालयांचा अनुशेष पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. माण, खटाव, कोरेगावसारख्या तालुक्यात दुष्काळमुक्ती व रोजगारनिर्मितीसाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील ७२ गावांचा कायापालट करुन दाखवला. गावात आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला.

गावांच्या विकासासाठी ११० कोटींचा आराखडा तयार करुन अंमलबजावणी केली. खाजगी उद्योग, स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं. डिजीटल शाळा, विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, बालविकास, बचतगट चळवळ सक्षम करणं, अशा अनेक स्तरांवर त्यांची कामगिरी सरस ठरली आहे. स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास योजनेसारख्या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यानं त्यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर अव्वल यश मिळालं आणि त्याबद्दल डॉ. देशमुख यांचं राष्ट्रीय स्तरावर कौतुकही झालं. अवघ्या १४ महिन्यात त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीत अमूलाग्र बदल घडवून जिल्हा परिषदेला वेगळी उंची प्राप्त करुन दिली.

यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही डॉ. राजेश देशमुख यांनी स्वतंत्र छाप पाडली. यवतमाळ जिल्ह्यात कापसावरील फवारणीमुळे एकावेळी २२ जणांचा मृत्यू झाला. डॉ. देशमुख यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वत: फवारणीयंत्र हाती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. फवारणीबाबत शेतकरी जनजागृतीसाठी अभियान सुरु केलं, त्यांच्या प्रयत्नांमुळेच नंतरच्या दोन वर्षात जिल्ह्यात विषारी फवारणीमुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही. शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांना वठणीवर आणलं. असहकार्य करणाऱ्या बँकांमधली सरकारी खाती बंद करुन शेतकऱ्यांना पिककर्ज देण्यास भाग पाडले. त्यांच्या कृतीचं कौतुक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतही झालं होतं. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, सर्वांसाठी घरे, राष्ट्रीय महामार्गाचे काम, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठीचं अधिग्रहण, ऑक्सिजन पार्क, शासकीय कामकाजात सुलभता अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉ.राजेश देशमुख यांनी यवतमाळचे लोकप्रिय व यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून जनमानसावर आपली छाप सोडली आहे.