आपल्या शहरावर बेहद प्रेम करणारं व्यक्तिमत्व निखळलं

शहरावर निस्सीम प्रेम करणारे अहमदनगरचे कोहिनूर, उद्योजक प्रदीपशेठ गांधी यांचे दुःखद निधन झाले.त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा… आपल्या शहरावर बेहद प्रेम करणारं व्यक्तिमत्व निखळलं. दिव्याची तेवत असलेली वातच कोणीतरी ओढून न्यावी…प्रदीपजी, का असं केलंत? तुमच्याशिवाय सारं काही सुनंसुनं आहे.आता शहराचे गोडवे कोणाकडून ऐकायचे? किती अभिमान तुम्हाला नगरचा? देशातपरदेशात जेव्हा जात असायचा तुम्ही, तेव्हा तिथलं चांगलं काही पाहिलं की आपल्याकडेही असं व्हावं असं तुम्हाला वाटायचं.आम्ही नेहमीच म्हणायचो, प्रेरणा तुम्हीच द्यावी, भरभरून कौतुक तुम्हीच करावं… परवाच रुग्णांची सेवा करणार्‍या हॉस्पिटलला मदत केलीत, रुग्णाला उपचारासाठी आर्थिक अडचण असेल तर मला सांगा, अशी भावना व्यक्त करीत दिलासा दिलात.

कोहिनूर कर्मचारी कुटुंबातील घटक असायचे तुमच्यासाठी,किती आस्था होती तुम्हाला त्यांची…

कोहिनूर कर्मचारी कुटुंबातील घटक असायचे तुमच्यासाठी,किती आस्था होती तुम्हाला त्यांची…शहराच्या इतिहासाविषयी असलेलं तुमचं प्रेम. तुमच्या प्रेमात पडलेला चांदबिबी महाल, तुम्ही आलात तर किती आनंदून जायचा.नगर आणि नगरातील माणसे, त्यांची वैशिष्ट्ये याविषयीच्या तुमच्या न संपणार्‍या गप्पा… साहित्य सांस्कृतिक,सामाजिक, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रातील तुमची आवड…प्रदीपजी, नातू ऋषीचं असलेलं तुम्हाला खूप सारं कौतुक. अश्विनच्या कामाविषयी त्याला असलेली समज… किती अभिमान वाटायचा तुम्हाला. रसिक ग्रुपचा गुढीपाडवा तुम्हीच मोठा केला, तुमचा आवडता भुईकोट किल्ल्याचा परिसर…किती खुलून बोलायचा तुम्ही. रमून जायचा अगदी…आपल शहर धार्मिक, ऐतिहासिक वास्तूंची भूमी. पर्यटन केंद्र होईल,भरभराट होईल शहराची ही तुमची आस्था. तुमचं साधेपण,बोलण्यातील मोकळेपण हीच तर तुमची समृध्दी…आदर्श व्यापारी अन् कोहिनूरला महाराष्ट्रात मिळालेली प्रतिष्ठा हा नगरचा गौरवच.तुम्ही जपलेलं तुमचं वाचन, संगीत,तुमच्यातील रसिकता किती कौतुक असायचं तुम्हाला शहराच्या पिढीविषयी.

कार्यकर्त्यांना नेहमीच जपलंत तुम्ही. उपक्रम जिवंत ठेवलेत. शहराचा श्वास होतात तुम्ही

कार्यकर्त्यांना नेहमीच जपलंत तुम्ही. उपक्रम जिवंत ठेवलेत. शहराचा श्वास होतात तुम्ही. काही चांगलं घडावं, शहर मोठं व्हावं, रोजगार वाढावा, बाजारपेठ फुलावी, नगरची मुलं इथेच राहावी… किती जीव लावला आम्हाला… याच काळात गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसलेत तुम्ही.प्रदीपशेठ, तुम्ही नेहमी म्हणायचा, आपलं शहर पूर्वी तांग्यांसाठी प्रसिद्ध होतं. नवीन पिढीला पुन्हा ही सफर घडवूया. आपली वैशिष्ट्ये आपणच जपायची असतात. तुम्ही खूप उत्साही होता. शेठ, का आणायचा
आता तांगा? आमचा देव तर निघून गेला.दिव्याची वातच नेली कोणी ओढून. हे शहर आज पोरकं झालं शहराचा अस्सल चाहता निघून गेला आमच्यातून…

प्रदीपशेठ, का गेलात तुम्ही ?……. जयंत