
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लीच दिल्ली दौरा केला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. फडणवीस दिल्लीत कोरोनाची परिस्थिती बघत असतील. त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करताहेत, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज शनिवारी प्रसिद्ध झाला.
फडणवीस यांनी राज्यातील परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला पाहिजे, याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही, यांचं ठीक आहे. हे बोलतील. बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. ही सुद्धा पोटदुखी असू शकेल. कारण कोरोनाची लक्षणे वेगवेगळी असतात.”विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर खरं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असे संकेत आहेत. पण हे संकेत विरोधी पक्षनेते फडणवीस पाळत नाहीत असे वाटते का? असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मी एक- दीड महिन्यापूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांची एक बैठक घेतली होती. येत्या काही दिवसांत अशी बैठक मी परत घेणार आहे. पंरतु त्या वेळेला मी त्यांना मोकळेपणाने सांगितलं होतं की, आपणही मोकळेपणानं आपली जी काही निरीक्षणं असतील, काही सुधारणा असतील तर सांगाव्यात, राजकारण तर आपल्या पाचवीलाच पुजलेले आहे.

विरोधी पक्षनेते पदाचे दिवसही धूमधडाक्यात साजरे केले जाताहेत
सदासर्वदा राजकारण एके राजकारण. पण कोरोनाची साथ हा जनतेच्या जिवाशी खेळ होतोय. तुम्ही काहीतरी लपवताय असं विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्याकडे वॉशिंग्टन पोस्ट वगैरे येत नसेल.गेल्या सहा महिन्यांचा काळ विचित्र पद्धतीने गेला. एक महिना झाला. सहा महिने झाले की हे सरकारचे वाढदिवस आतापर्यंत धूमधडाक्यात साजरे केले गेले. आता मला असं वाटतं विरोधी पक्षनेते पदाचे दिवसही धूमधडाक्यात साजरे केले जाताहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.जे सहा महिने गेले ते विविध आव्हानं घेऊन आले होते. ही आव्हानं अजून संपलेली नाहीत. राजकीय आव्हानं ठीक आहेत, त्याची मला चिंता नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे
