अहमदनगर (दि २३ जुलै २०२०) : जुन्या पेन्शन योजनेतून खासगी शाळांच्या शिक्षकांना वगळण्याच्या राज्य शासनाच्या नव्या अधिसूचनेचे पडसाद उमटावयास सुरुवात झाली आहे. या अधिसूचनेविरोधात आंदोलनाची तयारी शिक्षक भारतीने राज्यभरात सुरू केली आहे. अशी माहिती शिक्षकांचे नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली . राज्यातील सुमारे दोन लाख शिक्षकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली 1981मधील मसुद्याला बदलण्याची अधिसूचना शासनाने काढली आहे. राज्य सरकारने काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, राज्यातील खासगी शाळांमधील कार्यरत कर्मचार्‍यांना जुन्या पेन्शन योजनेच्या लाभातून वगळण्यात आले आहे. 10 जुलै रोजी काढलेल्या या अधिसूचनेमुळे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले, विनाअनुदान तत्त्वावर काम करणारे, अंशत: अनुदान तत्त्वावर काम करणारे अनेक शिक्षक जुन्या पेन्शन योजनेतून बाहेर पडणार आहेत. या सूचनेमुळे अनुदानित शाळांची व्याख्या बदलण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भारतीच्या वतीने राज्यभर पोस्टर आंदोलन करण्यात आले अशी माहिती जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी दिली.

सुनिल गाडगे व आप्पासाहेब जगताप बोलताना म्हणाले की शंभर टक्के अनुदान असणार्‍या शाळांनाच केवळअनुदानित शाळा म्हणून गृहीत धरले जाईल. 15 ते 20 वर्षे विनाअनुदानावर काम करून टप्पा अनुदानावर आलेल्या सर्व कर्मचार्‍यांना तसेच विनाअनुदानित वाढीव तुकड्यांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना मिळू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. या निर्णया विरोधात अहमदनगर जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षक नेते सुनिल गाडगे तसेच जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

नव्या अधिसूचनेद्वारे खासगी शाळांमधील कर्मचारी नियमावलीच्या मसुद्यातील बदलाला विरोध सुरू झाला आहे

या अधिसूचनेला विरोध करण्याचा निर्णय शिक्षक भारतीने घेतला आहे. अधिसूचनेतील बदलांवर शासनाने 11 ऑगस्टपर्यंत लेखी हरकती मागविल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांकडे या हरकती पाठवावयाच्या आहेत. हरकती नोंदविल्या जाव्यात, यासाठी शिक्षक भारती संघटनेने पुढाकार घेतला आहे.शिक्षकांनी शासनाकडे मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन शिक्षक नेते सुनिल गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, विजय कराळे ,योगेश हराळे, जितेंद्र आरु ,बाबासाहेब लोंढे ,महेश पाडेकर, किशोर ङोंगरे ,सिकंदर शेख, सुरेश मिसाळ . संतोष देशमुख ,हनुमंत रायकर ,सुदाम दिघे, महादेव कोठारे, प्रकाश मिंड, बाळासाहेब शिंदे, विलास माने, आवारे के एस, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे , संभाजी पवार, संपत वाळुंज, कैलास जाधव, हर्षल खंडीझोड, , आप्पासाहेब नलगे, सुदर्शन ढगे, गोरक्षनाथ गव्हाने, राजेंद्र जाधव, सचीन जासुद, प्रवीन मते, शाम जगताप , सचीन शेलार ,शरद कारंडे ,शंकर भिवसने, हनुमंत बोरुडे ,विलास वाघमोडे,मधुकर नागवडे,सतीश जामदार, राजेंद्र भगत ,राजेंद्र हिरवे , महादेव पवळ ,सोपानराव कळमकर आदींनी केले आहे.