
करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेनं ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेवरच निशाणा साधला आहे.

“सुरूवातीपासूनच करोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना लोकांना धीर देण्याऐवजी घाबवरण्याचं काम करत आहे. सुरूवातीला करोना विषाणू तितका धोकादायक नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि सारखं ते आपलं वक्तव्य बदलत आहेत.” असं म्हणत आव्हाड यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभारावर टीका केली. मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेनं सर्व देशांना इशारा दिला होता.
