
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक स्वगृही परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्व नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचं बोललं जात आहे. मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाचही नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी जवळपास २० मिनिटं चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
पारनेर नगरपंचायतीमधील पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ४ जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. बारामतीत पार पडलेल्या कार्यक्रमात नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर बोलताना पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही अशी प्रतिक्रिया मंगळवारी दिली होती. संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, “पारनेरच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक पातळीवरचा विषय होता, तो तिथेच संपायला हवा होता.
