अहमदनगर – कुरापतखोर चीनने भारतीय सीमेवर घुसखोरी करुन भारतीय जवानांवर हल्ला केला. चीनच्या हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेचा बुधवारी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने कापड बाजार येथे निषेध करण्यात आला. यावेळी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन करण्यात आले. तर चिनी माल रस्त्यावर फेकून चिनी मालाची खरेदी-विक्री करणार नसल्याची घोषणा व्यापार्‍यांनी केली.या आंदोलनात मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर शेख, नीरज काबरा, नईम सरदार, हमजा चुडीवाला, नावेद शेख, योगेश बिंद्रे, कमरुद्दीन सय्यद, हैदर पठाण, साहेबान जहागीरदार, फारुक रंगरेज, पठाण सर आदी व्यापारी सहभागी झाले होते.हे फक्त आंदोलन नव्हे तर चीनच्या कुरापतखोरीला लगाम लावण्यासाठी अहमदनगरचे व्यापारी आणि नागरिकांमधून उमटलेली संतप्त भावना आहे. चीनला प्रत्युत्तर देण्याची गरज असून,सर्व भारतीयांची चिनी मालावर बहिष्कार टाकल्यास त्यांना खर्‍या अर्थाने धडा शिकवता येणार आहे.सर्व व्यापारी चीनचा कोणताही माल घेणार नाही व विक्री देखील करणार नसल्याची भावना मोचीगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी व्यक्त केली.