
रायगड – राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत.करोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. आयआयटीने देखील परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्स्फर्ड विद्यापीठासह अन्य विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठे असेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगाविला. तसेच अगदीच कोणी काही चुकीचे केले, असा निष्कर्ष काढला असे मला वाटत नाही, असेही पवार म्हणाले.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे दोन दिवसीय कोकण दौ-यावर आहेत. यावेळी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर भाष्य केलं. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असे चित्र असताना,पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला. यावेळी शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौर्यावरुनही टोलेबाजी केली. मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात.समुद्राशी काहीही संबंध नाही.त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल, असे शरद पवार म्हणाले.
