अहमदनगर दि. 10 – जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोविड लवकर नियंत्रणात आला असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन सांगतात. त्यांच्याच पक्षाचे महाराष्ट्रातील नेते मात्र वेगळं बोलतात. मग नक्की खोटं कोण बोलतंय? नरेंद्र मोदी, हर्षवर्धन की फडणवीस आणि दरेकर,असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.जिल्ह्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

करोनाच्या मुद्द्यांवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं टीका करणार्‍या विरोधकांचा त्यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला. राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे राज्यात अनेकांचे बळी गेले आहेत, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला होता.त्याच्या या आरोपांनाही मुश्रीफ यांनी उत्तर दिलं.राज्य सरकार मोठ्या प्रमाणात तपासणी करीत नाही असं दरेकर म्हणतात. पण आम्ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या आयसीएमआरच्या निर्देशानुसारच काम करतो. त्यामुळं त्यांनी रुग्णांच्या तपासणीबाबत आम्हाला विचारण्याऐवजी आयसीएमआरला विचारावं,’ असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले म्हणून सिनियर झाले. नाहीतर ते माझ्याच सोबतचे आहेत. उलट 15 वर्ष मी मंत्री होतो. फडणवीस तर काहीच नव्हते, ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. प्रत्येक जण पंतप्रधान आणि प्रत्येक जण मुख्यमंत्री होऊ शकत नाही. ते नशिबातच लागते’, असा टोला मुश्रीफ यांनी फडणवीसांना हाणला.