Dr Jitendra Awhad File Photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. आव्हाड यांच्या संपर्कातील व्यक्तीला करोना झाल्याने आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाची करोना चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आव्हाड यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबाला करोना झालेला नसल्याचे सिद्ध झालं. असं असलं तरी आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. मात्र त्यानंतरही आव्हाड यांना करोना झाल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिले. यावरच संतापलेल्या आव्हाड यांनी आता आपल्या करोनाचा चाचणीचा रिपोर्ट ट्विटवर पोस्ट केला आहे.

Dr Jitendra Awhad Hospital Report
Dr Jitendra Awhad File Photo

“मी ठणठणीत बरा आहे.रस्त्यावर उतरुन काम करत आहे. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी माझ्या नावाचा वापर टीआरपीसाठी केला आहे. लोकं त्यांच्याकडील अशा बातम्या बघतात असं त्यांना वाटतं,” असा टोला आव्हाड यांनी ट्विटवरुन वृत्तांकन करणाऱ्या काही वाहिन्यांना लगावला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या करोना चाचणीच्या रिपोर्टचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी एएनआय आणि पीटीआय या दोन प्रमुख वृत्तसंस्थांना टॅग केले आहे. “मी एका महिन्यापासून मी बराच भटकत होतो. मात्र जो इतरांबरोबर चांगला वागतो देव त्याचं भलं करतो,” असंही आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.