
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे

करोनापासून होणारं नुकसान खूपच कमी ठेवण्यात भारताला यश मिळालं आहे. शिस्तबद्ध रितीनं भारतीयांनी कर्तव्याचं पालन केलं आहे. अनेकांना खूप त्रास भोगावा लागला. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हीच आदरांजली की प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात.अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात नववर्षाचं स्वागत देशभऱात झालं, परंतु लोकांनी नियमांचं संयमानं पालन केलं. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.

जगामध्ये करोनाची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने करोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहात. करोनाचे बाधित १०० होण्याच्या आधीच भारतानं विदेशी नागरिकांसाठी १४ दिवसांचं विलगीकरण केले. करोनाचे फक्त ५५० बाधित भारतात होते तेव्हाच भारतानं २१ दिवसांचा लॉकडाउन केला. भारतानं समस्या वाढण्याची वाट न बघता जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला. हे असं संकट आहे की तुलना योग्य नाही, पण वास्तव हे आहे की जगातल्या बड्या देशांचे आकडे बघितले तर लक्षात येतं की भारत खूपच चांगल्या स्थितीत आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

भारतात पण करोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसं व्हायचं, नुकसान कमी कसं होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर राज्यांबरोबर चर्चा होत आहे. सगळेजण हाच पर्याय देतात की लॉकडाउन वाढवायला हवा. अनेक राज्यांनी लॉकडाउन आधीच वाढवला आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
