
पीएम केअर फंडला सीएसआर अंतर्गत निधी स्वीकारण्याची मुभा केंद्र सरकारकडून तातडीने दिली जाते. मात्र सर्व कायदेशीर नियमनांच्या आधीन राहून वर्षानुवर्षे पारदर्शकपणे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री मदत निधीला ही परवानगी दिली जात नाही, हा दुजाभाव आहे,” असा आरोप काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

“सर्व राज्यांना तातडीने यासंदर्भात अनुमती दिली जावी,” अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. सावंत यांनी आज (सोमवार) काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सीएसआर अंतर्गत निधी स्वीकारण्याची मुभा मागण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, असे म्हटले आहे.“११ एप्रिल रोजी पंतप्रधान व देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह इतरही अनेक मुख्यमंत्र्यांनी केवळ पीएम केअर फंडलाच अशी परवानगी देण्याच्या भूमिकेला विरोध केल्याचे समजते. तरीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सीएसआर अंतर्गत निधी स्वीकारण्याची परवानगी देण्याबाबत पंतप्रधानांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही,” अशी नाराजी सावंत यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.

“कोवीड-१९ ची राज्यातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला देय असलेला त्यांच्या हक्काचा निधी तातडीने द्यायला हवा होता. मात्र, अद्याप राज्य शासनाला तो निधी प्राप्त झालेला नाही. केंद्राने राज्याला दिलेली मदत तुटपुंजी आहे. महाराष्ट्राला भक्कम आर्थिक पाठबळाची गरज असून, सीएसआरमधून हा निधी उभा करणे शक्य आहे
