अहमदनगर
 संतती जन्माबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी अखेर आठ दिवसानंतर माफी मागितली आहे. माझ्या अभ्यासानुसार मी जे काही बोललो त्याचा मीडियाने विपर्यास केला आहे. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं सांगत इंदुरीकर महाराज यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.इंदुरीकर महाराज यांनी  ही माफी मागितली आहे.

माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य केलं होतं. त्याचा गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातून विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या २६ वर्षांपासून समाजप्रबोधनाचं आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करत आहे. गेल्या २६ वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले होते.

मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, असं इंदुरीकर महाराज यांनी या माफीनाम्यात म्हटलं आहे. इंदुरीकर यांनी राज्यातील सर्व वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि आई समान असलेल्या सर्व महिला वर्गांना उद्देशून हा माफीनामा जारी केला आहे