ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहमदनगर ः दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चौघा आरोपींना फाशीची शिक्षा होऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यथित झालेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कायमचेच मौन पाळावे की काय, अशी उद्विग्नता व्यक्त केली.या गुन्हेगारांना दि. 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होते.त्याचे डेथ वॉरंटही जारी झाले होते. मात्र दयेचा अर्ज , फेरविचार याचिका अशा मार्गानी हे गुन्हेगार शिक्षा लांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी हजारे यांनी दि. 20 डिसेंबरपासून राळेगणसिध्दी येथे मौन धारण केले आहे. या मौनाचा आज 43 वा दिवस आहे. मात्र फाशीची शिक्षा लांबल्याने अण्णांच्या या आंदोलनात कुठलाही मार्ग निघालेला नाही.
फाशीच्या अमंलबजावणीला तूर्त सर्वोंच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याला तिहार तुरुंग प्रशासनाने आव्हान दिले असून या चारही गुन्हेगारांना तातडीने फाशी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका या विभागाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी झाली, मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.दरम्यान,राळेगणसिध्दी येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाताची सांगता येत्या गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. यावेळी अण्णांनी मौन सोडावे, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.तसा प्रयत्न सध्या सुरु आहे. मात्र, व्यथित झालेल्या अण्णांनी फाशीच्या शिक्षेला होत असलेला विलंब लक्षात घेता कायमचेच मौन धारण करावे की काय, अशी उद्ग्निता व्यक्त केली आहे. मौनामुळे आपल्याला कुठला त्रास होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
