AHMEDNAGAR NEWS

अहमदनगर– ग्लोबल मानव पब्लिक सेवा समिती,भ्रष्टाचार मुक्त अभियान यांच्या वतीने विविध प्रश्‍नांची
सोडवणूक करावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री हसन मुश्रिफ यांना माजी नगरसेवक शेख मुद्दसर अहमद इसहाक यांनी दिले. यावेळी शहराध्यक्ष शेख फारूक गुलाब, उपाध्यक्ष फय्याज तांबोळी आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, मुकुंदनगर फकिरवाडा भागात जबरदस्ती करून लाईटचे मीटर हे घरातून काढून पोलवर बसविण्यात येत आहेत. हे मीटर योग्य पद्धतीने लावावेत, वायर रोडवर लोंबकळत असून,त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.त्याबरोबरच मुकुंदनगर फकिरवाडा भागात महापालिकेच्या विशेष निधीतून सांस्कृतिकभवनाची उभारणी करावी,मुकुंदनगरमध्ये पाण्याची टाकी चालू करावी आदी मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे.मीटर एका ठिकाणीहून दुसर्‍या ठिकाणी बसवण्यात अनेक त्रुटी आढळून येत आहेत.मीटर जरूर पोलवर बसवा.मात्र, त्या अगोदर या भागातील पोलची संख्या वाढविणे गरजेचे आहे. या भागातील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून, ती कार्यान्वित करावी. या टाकीद्वारे नळजोडणी करून पाणी तातडीने सोडावे.मुकुंदनगर परिसराच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करावा. या भागात गोरगरीब व मध्यवर्गीय जनता वास्तव्यास असून, त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ना. मुश्रिफ यांनी या प्रश्‍नी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे.