अहमदनगर : बीएमडब्ल्यू वाहनाच्या खरेदी-विक्री व्यवहारातून शहरातील गाडी-खरेदी विक्री करणार्‍या व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणात तोफखाना पोलिसांनी गाडीसह एकास मुंबईतून ताब्यात घेतले आहे. नासीर निसार मोहंमद कुरेशी असे आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयाने 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अरबाब अत्तारअली सय्यद (रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी 3 जुलै रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती. सय्यद यांनी कुरेशी याच्याकडून बीएमडब्ल्यू ही अलिशान कार (एमएच 12 एलपी 0333) खरेदी केली होती. त्यापोटी 3 लाख 50 रुपये देऊन 78 हजार 578 रुपयांचे 53 हप्ते सय्यद यांनी द्यायचे ठरले होते. सय्यद यांनी 5 लाख 50 हजार 046 रुपये असे 7 हप्ते कुरेशी याच्याकडे जमाही केले. कुरेशी याने गाडीचे व्हेरिफिकेशन करायचे असल्याचे कारण देत जाहीद शेख याच्यामार्फत सय्यद यांच्याकडून गाडी मुंबईला मागवून घेतली. दोन दिवस गाडी माझ्याकडेच राहू दे, असे सय्यद याला सांगितले. सय्यद गाडी परत आणण्यासाठी मुंबईला कुरेशी यांच्याकडे गेले असता, त्याने गाडी देण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सय्यद यांनी तोफखाना पोलिसात 9.40 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी व स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने कुरेशी याला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. फसवणूक प्रकरणातील बीएमडब्ल्यू कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कुरेशी याला न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.