अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या 22.90 कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने डॉ. नीलेश शेळके याला अटक केली असून न्यायालयाने डॉ. शेळकेला मंगळवार दि. 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली. तसेच शनिवारी सकाळी या गुन्ह्यातील आरोपी डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे यांना देखील अटक केली आहे.

नगर अर्बन बँकेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी या फसवणुक प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार डॉ. नीलेश शेळके, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, स्पंदन हेल्थकेअरचे जगदीश कदम यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. 

हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. नगर अर्बन बँकेतून डॉ. नीलेश शेळके, डॉ. सिनारे, डॉ. श्रीखंडे यांच्या नावावर प्रत्येकी पाच कोटी व डॉ. कवडे याच्या नावावर सात कोटी 90 लाखांचे कर्ज घेण्यात आले होते. मशिनरी खरेदीसाठी हे कर्ज घेण्यात आले होते. मात्र, या रकमेतून मशिनरी खरेदी न करता कर्जाची रक्कम इतरत्र वापरल्यामुळे बँकेची फसवणूक झाली. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला होता.

डॉ. शेळके सध्या इतर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. त्याला आर्थिक गुन्हे शाखेने 22.90 कोटींच्या फसवणूक प्रकरणात वर्ग करून अटक केली आहे. तर शनिवारी सकाळी डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे यांना अटक करण्यात आली आहे. 

डॉ. शेळकेला न्यायालयासमोर हजर केले असता कर्जाच्या रकमेचा वापर कसा झाला, ही रक्कम कुणाकडे गेली, कुणाच्या खात्यात रकमा वर्ग झाल्या, यात आणखी कुणाचा समावेश आहे, याचा सर्व तपास करायचा असल्याने डॉ. शेळकेला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. न्यायालयाने शेळके याला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.