
अहमदनगर (दि १८ जून २०२१) : दारुची वाहतूक करणार्या वाहनावर पाळत ठेवून पाठलाग करुन व वाहन अडवून लुटमार करणार्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.28 मे 2021 रोजी रात्रीचे वेळी फिर्यादी अन्सार हसन पठाण, वय- 26 वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. माणिक दौंडी, ता. पाथर्डी हे आयशर टेम्पो नं . एमएच – 14 – डीएम -0800 यामध्ये चिखलठाणा एमआयडीसी, औरंगाबाद येथून विदेशी दारुचे बॉक्स भरुन क्लिनर अमोल काळे याचेसह औरंगाबाद-नगर रोडने कोल्हापूरकडे जात असताना रात्री साडेअकराच्या सुमारास ईमामपूर घाट येथे आले असता पाठीमागून कारमधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी टेम्पोला कार आडवी लावून, छर्याचे बंदूकीचा धाक दाखवून टेम्पोमधील दारुचे बॉक्स व मोबाईल असा एकूण 10 लाख 30 हजार 791 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. त्यानंतर फिर्यादीने याबाबत नियंत्रण कक्षात कळविले होते.
पोलिसांनी जीपीएस प्रणालीवरुन टेम्पोचे लोकेशन घेतले. टेम्पोमधील दारु चोरी प्रकरणी एमआयडीसीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना हा गुन्हा स्वप्नील गोसावी, रा. सिन्नर, याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने स्वप्नील उर्फ भुषण सुनिल गोसावी, वय -21 वर्षे, मूळ रा. ऐश्वर्या देवी मंदीराजवळ यास नामपूर येथून ताब्यात घेतले.
त्यास पोलिस खाक्या दाविताच सदर गुन्हा हा साथीदार संतोष खरात, गणेश कापसे, भारत सुतार अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. संतोष उर्फ खरात, कुलदिप उर्फ गणेश मनोहर कापसे, भारत सिताराम सुतार यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल ताब्यात घेतला आहे.