अहमदनगर :  जिल्ह्यातील निर्बंध शिथील केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. मात्र, याठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महानगरपालिका आणि तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त न पाळण्यास कोरोना संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध लागू शकतील. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, हे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. कमी चाचण्या होणाऱ्या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र, आता निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करावे. निर्बंध शिथील झाले असले  तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. ज्याठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तात्काळ कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दैनंदिन व्यवहार सुरु झाले असले तरी दुकानेअधिनियमांतर्गत दिलेल्या वेळेतच दुकाने आस्थापना सुरु आणि बंद करणे अपेक्षित आहे. याबाबत संबंधित नगरपालिकांनी वेळेसंदर्भात ठराव केले असतील तर त्याची अंमलबजावणी केली जावी. याबाबत त्या-त्या क्षेत्रातील नागरिक आणि व्यापारी यांच्या पर्यंत ती माहिती पोचवावी. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांच्या चालकांनीही त्यांच्या दुकानात येणारे ग्राहक अथवा दुकानात काम करणारे कामगार कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत असल्याबाबत खात्री करावी. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले.  विशेषता भाजी विक्री, दूधविक्री, किराणादुकाने व अन्य आस्थापनांच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही,  हे पाहावे.

जिल्ह्यात हिवरे बाजार पॅटर्न राबवला जात आहे. नगरपालिका क्षेत्रातही वॉर्डनिहाय पथके स्थापून त्याप्रमाणे कार्यवाही करावी. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांची मदत याकामी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात  ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहेत. तेथील व्यवस्था १५ जूनपर्यंत पूर्ण व्हावी, यादृष्टीने कार्यवाही करण्यासही त्यांनी सांगितले.