जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन तर जिल्हा उपनिबंधकां समवेत केली बैठक

अहमदनगर प्रतिनिधी : जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने, भाजी विक्रेते यांना प्रशासनाने मुभा दिली आहे. मात्र जुने मार्केट यार्ड, कापड बाजार आणि शहराच्या सर्व भागांमध्ये असणारे नॉन इसेन्शियल गटामध्ये मोडणारे व्यवसायिक यांना देखील दिलासा मिळणे गरजेचे आहे. याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना बाजार खुले करण्यासंदर्भात मागणी करणारे निवेदन दिले असून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्यासमवेत बैठक केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले असून काँग्रेसने कापड बाजार त्याचबरोबर शहराच्या इतर भागांमध्ये असणारे सर्व दुकानदार यांना देखील प्रशासनाने दिलासा देत दुकाने सुरू करण्यासाठीची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर जुन्या मार्केट यार्डमध्ये भाजी, फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांना देखील त्यांची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्याच्या दृष्टीने जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्यासमवेत काळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक केली आहे.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील,नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुजित जगताप आदी उपस्थित होते.

किरण काळे यांनी या बैठकीत व्यापाऱ्यांची बाजू मांडताना म्हटले आहे की, नेप्ती उपबाजारामध्ये भाजी, फळ विक्रीसाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याच बरोबर भुसार बाजार देखील सुरू केला आहे. नगर शहराला लागणारा भाजी व फळे पुरवठा हा जुन्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर होत असतो. नेप्ती बाजाराला परवानगी देत असताना जुन्या मार्केट यार्डला परवानगी न दिल्यामुळे नेप्ती बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचबरोबर एका बाजाराला परवानगी आणि दुसऱ्या बाजाराला परवानगी न मिळाल्यामुळे जुन्या बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे.

दोन्ही बाजार सुरू झाले तर एका ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाऊन गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाला मदत होऊ शकते. मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांनी किरण काळे यांची भेट घेत बाजार सुरू करण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा असे साकडे काळे यांना घातले आहे. त्यानंतर काळे यांनी काँग्रेस शिष्टमंडळास जिल्हा उपनिबंधक आहेर यांच्यासमवेत बैठक केली. तसेच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

किरण काळे याबाबत माहिती देताना म्हणाले की, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. मार्केट यार्ड मध्ये व्यापाऱ्यांनी गर्दी व्यवस्थापन करण्या संदर्भातला आराखडा तयार केला असून तो प्रशासनाला ते देत आहेत. प्रशासनाच्या सर्व नियमांची पालन करण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी आपल्याकडे मांडली आहे. एमजी रोड वरील व्यापाऱ्यांच्या असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची देखील काँग्रेस समवेत बैठक झाली असून त्यांच्या देखील बाजार उघडण्यास संदर्भातल्या भावना या तीव्र आहेत.

*काळे म्हणाले की, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याशी मार्केट यार्ड तसेच कापड बाजार आणि शहरातील इतर व्यापाऱ्यांच्या भावना याबाबत मी चर्चा करणार असून त्यांच्या माध्यमातूनच व्यापाऱ्यांना न्याय मिळू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. आडते बाजार, डाळ मंडई मधील व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये ना. थोरात यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे. उर्वरित व्यापारी घटकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ना.थोरात यांच्या माध्यमातून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने पुढाकार घेतला आहे. व्यापार्‍यांच्या भावना लक्षात घेता प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा काळे यांनी व्यक्त केली आहे.