नवी दिल्ली (दि ३ जुन २०२१) : भारतीय औषध निर्माती कंपनी पॅनेशिया बायोटेकनं बनवलेली स्पुतनिक वी लसीची पहिली खेप चाचणीसाठी रशियाला रवाना करण्यात आली आहे. रशियात त्या लसीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात येणार आहे. स्पुतनिक वी लसीची निर्मिती हिमाचल प्रदेशातील एका कंपनीमध्ये करण्यात आळी आहे. गुणवत्ता चाचणी यशस्वी ठरल्यास उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.

रशियाची आरडीआयएफ आणि पॅनेशिया बायोटेक यांच्यासोबत एप्रिलमध्येच स्पुतनिक वी लसीचं उत्पादन करण्याबाबत चर्चा झाली होती. पॅनेशिया बायोटेक यावर्षाच्या अखेरपर्यंत 10 कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. आरआयडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिमित्रीव यांनी म्हटलं कि पॅनेशिया बायोटेकच्या साथीनं कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन या महामारीशी लढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल.

स्पुतनिक वी लसीच्या निर्मितीसाठी चाचणी परवाना देण्यासंबंधी सीरम इन्स्टिट्यूटचाही अर्ज

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं बुधवारी डीसीजीआयला स्पुतनिक वी लसीच्या निर्मितीसाठी चाचणी परवाना देण्यासंबंधी अर्ज केल्याची माहिती आहे. रशियाची स्पुतनिक वी लस सध्या भारतात तयार करण्याचं काम डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी करत आहे.दुसरीकडे सीरमनं जून महिन्यात भारत सरकारला कोविशील्ड लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याचं यापूर्वीचं जाहीर केलं आहे.