श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील उपप्रादेशिक परिवहन ( आरटीओ) कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह दोन मोटार वाहन निरीक्षकांचा शासकीय सेवानिवृत्तीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिगचे सर्व नियम पाळत सत्कार करण्यात येऊन त्यांना निरोप देण्यात आला,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक अहमद खान, मोटार वाहन निरीक्षक अशोक वाघ आणि मोटार वाहन निरीक्षक शाहिद सय्यद हे तीन अधिकारी ३१ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक अहमद खान यांनी श्रीरामपूर येथे आपली दोन वर्ष उत्कृष्ट सेवा दिली, सन १९८५ साली ते या खात्यात रुजू झाल्यापासून आपल्या शासकीय सेवा कार्यकाळात त्यांनी मुंबई, रत्नागिरी, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी चिंचवड (पुणे), जालना व शेवटी श्रीरामपूर येथे यशस्वीरीत्या आपली कारकिर्द सांभाळली,

मोटार वाहन निरीक्षक अशोक वाघ हे देखील  सन १९८५ साली या खात्यात रुजू झाले असल्याने त्यांनी बीड, जळगाव, नांदेड, धुळे, नंदुरबार व शेवटी श्रीरामपूर येथे दोन वर्ष सेवा दिली,सन १९९४ साली परिवहन खात्यात रुजू झालेले मोटार वाहन निरीक्षक शाहिद सय्यद यांनी नाशिक, अहमदनगर, नांदेड, नागपूर व शेवटी श्रीरामपूर येथे सेवा दिली.

श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्वच्छ प्रतिमा जनमानसात रुजविण्यासाठी या तिघांनीही विशेष परिश्रम घेतले. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी कायम सुसंवाद ठेवत जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. विशेष म्हणजे कोविडपूर्व काळात महसूलचे ९५ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात त्यांनी विशेष यश मिळविलेले आहे.

वाहन चालक मालक प्रतिनिधी संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी नामवंत व दिग्गज लेखक तसेच राजकारण्यांचे लेख समाविष्ट असलेले बहुचर्चित `ऐैवज´ हे पुस्तक भेट देऊन त्यांचा भावनिक सत्कार केला.

याप्रसंगी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, मोटार वाहन निरीक्षक जयश्री बागुल, संदीप निमसे, विलास वडीतके, जमिर तडवी, गणेश पिंगळे, विनोद घनवट, अर्चना फटांगरे – घनवट, लिपिक विलास नागरे, प्रकाश शिलावट, निशिकांत दोंदे, सारंग पाटील, वैभव गावडे, अंकुश भेंडे, रावसाहेब शिंदे, नरेंद्र इंजापुरी, सुनिल निमसे, राजेंद्र गरड, भरत घुणावंत, विशाल पाटील, रुपाली ठाकरे, श्रीकांत शेरे, अभिजीत कुऱ्हाडे यांसह मयूर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक प्रताप शिंदे, वाहन चालक – मालक प्रतिनिधी संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर आदी उपस्थित होते.        

परिवहन कार्यालयातील कामांसाठी सर्वसामान्यांनी संगणकीकरणावर जोर देऊन ई- सेवेचा फायदा घ्यावा, राज्य सरकारने रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेले १५०० रुपयांच्या मानधनाचा ऑनलाईन अर्ज भरून सर्वांनी लाभ घ्यावा. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातच एक ऑनलाईन मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांनी आपले आधार कार्ड पडताळणी करून अर्ज भरावेत.
                अश्पाक खान  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर                  

अश्फाक खान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यापुढील काळातही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लोकाभिमुख कामे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, त्यासाठी जनतेने देखील आपल्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे. 
                         गणेश डगळे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर