File Photo

 राजस्थानमध्ये एक कार पोलिसांनी जप्त केली आहे, ज्यात कोट्यवधी रुपये सापडले आहेत. कारमध्ये सापडलेले पैसे मोजण्यासाठी चक्क बँकेतून मशीन्स मागवाव्या लागल्या. राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी गुजरातकडे जाणारी एक कार जप्त केली.

या कारमध्ये पोलिसांना कोट्यवधी रुपये सापडले आहेत. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून ही कार गुजरातकडे जात असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस सध्या दोघांची चौकशी करत आहेत.

डुंगपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलिसांनी कार रोखली. त्यानंतर झाडाझडती घेतली असता, त्यात मोठी रक्कम आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली. हे कोट्यवधी रुपये दिल्लीहून गुजरातला हवालाच्या मार्गे नेण्यात होते, अशी माहिती आता समोर येत आहे.

पोलीस उपअधीक्षक मनोज सवारिया म्हणाले,”पैसे जप्त करण्यात आले आहेत आणि आरोपींची चौकशीही केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण हवालाशी संबंधित असल्याचं दिसून येत आहे. पोलीस सध्या तपास करत असून, आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे,” अशा माहिती सवारिया यांनी दिली.

कारची झाडाझडती घेतल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. कारमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा होत्या. कारमध्ये असलेल्या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना बँकेमधून मशीन्स मागवाव्या लागल्या. सकाळी सुरू झालेलं नोटा मोजण्याचं काम सायंकाळपर्यंत सुरू होतं. ज्या कारमधून ही रक्कम घेऊन जाण्यात येत होती. त्या गाडीचा क्रमांक ‘डीएल८ सीएएक्स३५७३’ असा आहे. या कारमध्ये दिवसभर मोजण्यात आलेली रक्कम हि एकूण साडे चार कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.