अहमदनगर (पारनेर २३ मे २०२१) : महाराष्ट्रात सध्या आमदार निलेश लंके आणि त्यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरची चर्चा आहे. या कोविड सेंटर सध्या महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते या सेंटरला भेट देत असून शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने सुरु केलेल्या या वैद्यकीय केंद्राला शनिवारी रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. त्यानी आमदार लंके करत असलेल्या कामाचे कौतुक करत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पवार साहेबांचा सच्चा माणूस समाजात काम करत असल्याचे  गौरवोद्गार पाटील यांनी काढले.

आमदार निलेश लंके यांनी पुढाकार घेऊन भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने 1100 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. येथून हजारो रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजही मोठ्या प्रमाणात येथे कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. लोकसहभागातून सुरु केलेले हे कोविड  सेंटर राज्यासाठी रोल मॉडल ठरत आहे. येथे रुग्णांना मोफत उपचार दिले जातात राहण्याबरोबरच जेवणाची सोय सुद्धा येथे करण्यात आली आहे.

त्याचबरोबर वातावरण आल्हाददायक ठेवण्यासाठी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरात दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  सकाळी योगा अभ्यासाचा वर्ग घेतला जातो. एकंदरीतच एक आदर्श असे कोविड  सेंटर आमदार निलेश लंके त्यांनी उभारले आहे. त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र सुरु आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोन द्वारे आमदार निलश लंके यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

 प्रदेशाध्यक्षानी मंत्रालयात पारनेर नगरच्या आमदारांना अभिनंदनाचे पत्र देऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. शनिवारी जलसंपदामंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या  दौऱ्यावर होते. त्यानुसार त्यांनी संध्याकाळी भाळवणी येथील कोविड सेंटरला भेट दिली. जयंत पाटील यांनी येथील उपचार पद्धती त्याचबरोबर रुग्णांसाठी करण्यात आलेली व्यवस्था, दररोज होणारे कार्यक्रम जेवणाचे नियोजन या सर्व गोष्टींची माहिती घेतली. त्याचबरोबर कोरोना रुग्णांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी संवाद साधला. 

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी विद्यार्थी आयटी सेल प्रमुख जितेश सरडे अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, राहुल झावरे, बापूसाहेब शिर्के व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पारनेर तालुका पदाधिकारी तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 अनेक दिवसांपासून या कोविड सेंटर बद्दल ऐकत होतो. परंतु आज प्रत्यक्ष पाहिल्यावर निलेश लंके यांचा अभिमान वाटत आहे. या कोरोना काळात एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील लोक दूर जात आहे. परंतु आमदार निलेश लंके यांनी हजारों रुग्णांना जीवनदान दिले आहे. दुख व वेदना विसरण्यासाठी व माणुसकी जपण्यासाठी  खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा  सच्चा माणूस आमदार निलेश  लंके यांच्या रुपाने समाजामध्ये काम करीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांच्या या कार्याचा गौरव करतो. कोरोना कमी होत आहे. त्यामुळे हळूहळू हा रेट कमी होईल. आगामी काळात येणाऱ्या लाटेसाठी सरकार सज्ज झाले. ऑक्सिजन व इतरही औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे २५ लाख रुपयांची औषधे या कोव्हिड सेंटर साठी भेट दिली आहेत.