पुणे : करोना संकटाच्या काळात करोना रूग्णांना घरापासून कोवीड सेंटर आणि हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी आता शहरात मोफत टॅक्‍सी कॅब सेवा उपलब्ध असणार आहे. राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलच्या पुढाकाराने ही सेवा सुरू करण्यात आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी या सेवेचे लोकार्पण केले.

महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेता दिपाली धुमाळ, नगरसेविका अश्विनी कदम, वीरेंद्र किराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

करोना संकटात लॉकडाऊन असल्याने हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम, राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी सेलचे अध्यक्ष भोलासिंगजी अरोरा, उपाध्यक्ष रोहन राजेंद्र सोनिस यांच्या पुढाकाराने तसेच श्री शांताई टूर्स ऍन्ड ट्रॅव्ह्सच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे.

 त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी अडचण असल्यास तातडीनं या सेवेचा लाभ घ्यावा तसेच ही सेवा पूर्णत: मोफत असून सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत 8329816952, 9527777712 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कदम यांनी केले आहे.