दुबईमध्ये कुणाल बांदोडकरसोबत आपण लग्नगाठ बांधल्याचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जाहीर केलंय. सोशल मीडियावर सोनालीचं लग्न चर्चेचा विषय ठरला आहे.अवघ्या चार लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. सोनालीच्या आई-वडिलांनाही या लग्नाला उपस्थित राहता आलं नाही.आपल्या या लग्नाबद्दल सोनालीनं एक पोस्ट लिहिली आहे. जगभरात सध्या सुरू असलेली साथ लक्षात घेत मोठा समारंभ आणि अनावश्यक खर्च टाळत हे लग्न केल्याचं सोनालीने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.

या पोस्टमध्ये सोनालीने म्हटलंय, “जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे, ना की समारंभ’.  आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही. आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो.गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बांदोडकर यांचा दुबईत साखरपुडा झाला होता. जुलै महिन्यात युकेमध्ये त्यांचं लग्न होणार होतं. याच्या तयारीसाठी मार्च महिन्यात सोनाली दुबईला गेली होती.

पण त्यानंतर कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने उसळी घेतली आणि प्रवासावर मर्यादा आल्याने सोनाली दुबईत अडकली.क्वारंटाईन, प्रवासासाठीचे नियम, कुटुंबासाठी असलेला धोका, होणारा अनावश्यक खर्च, सरकारी नियम हे सगळं लक्षात घेता मे मध्येच लग्न करण्याचा निर्णय आपण घेतल्याचं सोनालीने म्हटलंय.तासाभरात खरेदी करत, देवळामध्ये 4 लोकांच्या साक्षीने हे लग्न पार पडलं. यावेळी सोनालीचे आईवडील भारतात तर कुणालचे आईवडील युकेमध्ये होते.काही काळाने जेव्हा शक्य होईल तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि मित्रमैत्रिणींच्या सोबत ‘ड्रीम वेडिंग’ करणार असल्याचं सोनालीने या पोस्टमध्ये म्हटलंय.

सोनालीनं आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

आम्ही जूनमध्ये यूकेमध्ये लग्न करणार होतो. यूकेच्या सेकंड वेव्हमुळे तारीख पुढे करावी लागली, मग जुलैमधी तारीख ठरली.लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शूटिंग संपवून दुबईला आले आणि भारतात सेकंड वेव्ह आली.एप्रिलमध्ये यूकेनं सर्व भारतीयांसाठी ट्रॅव्हल बॅन जाहीर केला. क्वारंटाइन, प्रवासासाठीचे निर्बंध, फॅमिलीसाठी असणारी रिस्क, अनावश्यक खर्च या सगळ्याचा विचार करून आम्ही भलामोठा लग्न समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला. जूनचं जुलै होतंय, म्हणलं postpone करायच्या ऐवजी मे मध्ये करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.

आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही.आताच शिक्कामोर्तब करून टाकू.