जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पास मंजुरी.

जामखेड, १४ मे २०२१ कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्यासह देशात ऑक्सीजन तुटवड्यामुळे सर्वच यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या अडचणीच्या काळात दोन्ही तालुक्यात ऑक्सीजनचा तुटवडा होणार नाही याची सर्वतोपरी काळजी आ. रोहित पवार यांनी घेतली. कुठल्याही परिस्थितीत आ. रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णांसाठी ऑक्सीजन कमी पडू दिला नाही. दरम्यान दुदैवाने तिसरी लाट आल्यास ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी पूर्वनियोजन करून आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून जामखेड तालुक्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला जिल्हा प्रशासनामार्फत मंजुरी मिळाली असून जामखेड तालुका ऑक्सीजन निर्मितीत आता स्वयंपूर्ण होणार आहे. 

       कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून वाढते संक्रमण रोखण्यासाठी विविध प्रभावी व नाविन्यपूर्ण उपाययोजना आ. रोहित पवार राबवत आहेत. जामखेड येथे सुसज्ज जम्बो कोव्हीड सेंटर उभारून रुग्णांना चांगल्याप्रकारे आरोग्य सुविधा पुरवण्यास आ. रोहित पवार कटिबध्द राहिलेले आहेत. परिणामी जामखेडसह आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णही या ठिकाणी येऊन उपचार घेत आहेत. रुग्णांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये हाच अट्टहास असलेल्या आ. रोहित पवारांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणखी एक मोलाची कामगिरी बजावत जामखेडकरांची मने जिंकलेली आहेत. आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेडमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात देखील झाली आहे. 

      कोरोनाच्या या दुस-या लाटेत जेव्हा जेव्हा ऑक्सीजनची गरज भासली त्या त्यावेळेस शासकीय व खासगी यंत्रणांना ऑक्सीजन मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मात्र आ.रोहित पवार यांनी ऑक्सीजनची ही उणीव आपल्या जामखेड तालुक्यातील रुग्णांना कदापी भासू दिली नाही. दरम्यान भविष्यातील दृष्टीकोनातून जामखेडमध्ये उपचार घेणा-या रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा याकरिता जामखेडमध्ये हा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. याद्वारे जामखेडमध्ये ६५० एलपीएम ऑक्सीजन निर्मिती होणार असून या प्रकल्पातून १२५ ऑक्सीजन सिलेंडर प्रति दिवशी भरले जाणार आहेत. हवेतून ऑक्सीजन संकलित करून त्याद्वारे द्रवरुप ऑक्सीजनची निर्मिती या प्रकल्पात होणार आहे. 

      या प्रकल्पामुळे जामखेड तालुका ऑक्सीजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कर्जत येथे १८ केएल लिक्वीड ऑक्सीजन स्टोरेज टँकला देखील मंजुरी मिळाली असून त्याद्वारे ऑक्सीजन साठवणूक देखील करता येणार असल्याने यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील इतर कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सीजन सिलेंडर मिळवण्यासाठी तारेवारची कसरत करावी लागणार नाही.