अहमदनगर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा अहमदनगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयावर पडणारा भार लक्षात घेऊन कर्जत—जामखेडमधील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातुन अहमदनगर शहरातील पोलिस कवायत मैदानावर ३०० खाटांचे  कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे ऑक्सिजन सुविधाही उपलब्ध आहे.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व महापालिकेच्या सहकार्यातून हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. आ. रोहित पवार यांनी कर्जत व जामखेडमध्ये प्रत्येकी १ हजार अशा एकूण २ हजार खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. त्याचा रुग्णांना उपयोग होत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण मोठय़ा संख्येने अहमदनगर शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे शहरातील आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन शहरातील पोलीस कवायत मैदानावर ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

या कोविड सेंटरसाठी जिल्हा सरकारी रुग्णालय, आ. जगताप व मनपाचे सहकार्य मिळाले. त्यांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळ, जेवण पुरवण्यात येणार असून स्वच्छता, दैनंदिन नियोजनाची जबाबदारी मनपा पाहणार असल्याचे आ. पवार यांनी सांगितले.