अहमदनगर : राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर तुटवडा असताना हे इंजेक्शन अनधिकृतपणे कोठून आणले, ते कथितरित्या वितरीत केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खासदार सुजय विखेंची नगर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलिस उपधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे दिली आहे.

या प्रकरणात खा. विखे यांच्या चांगल्याच अडचणी वाढणार असल्याचे दिसते आहे.अहमदनगर शहरातील धडाकेबाज कामगिरी आणि तपासाची आगळी वेगळी शैलीमुळे संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेले असलेले सध्या श्रीरामपूरला कार्यरत डीवायएसपी संदीप मिटके यांनी तपासाची सूत्रे हाती घेताच तातडीने शिर्डी विमानतळ गाठत तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. १० एप्रिल ते २५ एप्रिल २०२१ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत.

संदीप मिटके हे प्रामाणिक व सोपविलेली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करणारे अधिकारी म्हणून पोलिस दलात ओळखले जातात. राज्यातील बहुचर्चित खा. सुजय विखेंच्या रेमडेसीवीर वाटप प्रकरणात त्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने खा. विखे यांच्या समोरील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

या प्रकरणात दि.२९ रोजी उच्च न्यायालयाने नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना चांगलेच फटकारले होते. दुसरीकडे, उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्या सामाजिक कार्यकर्त्यां विरोधात विखे समर्थकांकडून अनेक ठिकाणी निषेध करण्यात येत होता.