मुंबई (दि २७ एप्रिल २०२१) : उद्या मंत्रिमंडळ बैठकीत मोफत लसीकरणाबाबत निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. लसीचा तुटवडा संपूर्ण देशाला आहे. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे.अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे लसीकरण हे मोठे आव्हान आहे.यासाठी जवळपास साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

या सगळ्यासाठी सरकार तयार आहे,पण लसीची उपलब्धता ही मोठी बाब आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकार, सीरम आणि भारत बायोटेक यांना पत्र लिहिले आहे.दोन दिवसांपासून त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.ते म्हणाले, एका दिवसात आठ लाख लसीकरण शक्य आहे. त्यासाठी पुरेशा लसी मिळणे गरजेचे आहे.

लसींबरोबरच १० लाख रेमडेसिवीर व्हायल आणि ऑक्सिजन प्लांटसाठी ग्लोबल टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या टेंडरचा कालावधी तीन दिवसांचा आहे. सध्या सर्वजण लसीकरणासाठी एक तारखेची वाट पाहत आहेत. राज्यातील सर्वांसाठी लसीकरणासाठी जो खर्च येणार आहे त्याबाबत उद्याच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार आहे.

ही लस आर्थिक दुर्बल घटकाना मोफत द्यायची की सर्वांना याबाबत निर्णय होईल. ही लस विकत असो की मोफत त्यासाठी सर्व राज्ये तयार आहेत. पण लसीची उपलब्धता असणे ही मोठी बाबत आहे. केद्रीय आरोग्य सचिव, सीरम इनस्टिट्यूट,भारत बायोटेक या तिघांनाही दोन दिवसांपूर्वी पत्र लिहिले आहे. त्यांना उपलब्धतेबाबत विचारणा केली आहे. त्यांच्या उत्तराची वाट आम्ही पाहत आहोत.